अहिल्यानगर (प्रतिनिधी) शाळा प्रवेशोत्सव २०२५ कार्यक्रमांतर्गत जिल्हाभरातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे पहिल्या दिवशी लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन मोठ्या उत्साहाच्या वातावरणात स्वागत केले. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना समग्र शिक्षाअंतर्गत मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, बुट, पायमोजे आदींचे वितरणही करण्यात आले. शाळेच्या पहिल्याच दिवशी मान्यवरांनी केलेल्या स्वागताने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता.जिल्हा परिषदेच्या शाळेत दाखलपात्र ५९ हजार ५२७ विद्यार्थ्यांपैकी ३५ हजार ३०९ विद्यार्थी तर इतर व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये १९ हजार २१७ शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थी दाखल झाले.
खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी राहाता येथील शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत केले. हंगा येथील शाळेमध्ये खासदार निलेश लंके यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. शेवगाव तालुक्यातील वरुर येथील शाळेत आमदार मोनीका राजळे यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. आमदार किरण लहामटे यांनी अकोले तालुक्यातील कातळापूर येथील शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत केले. आमदार अमोल खताळ यांनी संगमनेर येथील शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत केले. आमदार हेमंत ओगले यांनी श्रीरामपूर व राहूरी येथील शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत केले. आमदार विठ्ठलराव लंघे यांनी नेवासा तालुक्यातील गेवराई येथील शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत केले. आमदार काशिनाथ दाते यांनी टाकळी ढोकेश्वर ता. पारनेर येथील शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत केले. आमदार विक्रम पाचपूते यांनी श्रीगोंदा येथील शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
शाळा प्रवेशोत्सवप्रसंगी जिल्हा परिषदेचे सर्व उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व विभागांचे विभागप्रमुख, तालुकास्तरावरील तहसिलदार, गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांच्यासह जिल्ह्यातील वर्ग-१ व वर्ग-२ अधिकाऱ्यांनी ३०४ शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. नवागतांच्या स्वागतासाठी रांगोळी, वर्ग सजावट करण्यात आली होती. गावा-गावातून प्रभातफेऱ्यांचे आयोजन करण्यात आले होते. पहिले पाऊल उपक्रमांतर्ग इयत्ता १ लीच्या विद्यार्थ्यांच्या पावलांचे ठसे घेऊन पालकांना त्यांची प्रतही देण्यात आली.
लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी समारंभपूर्वक केलेल्या स्वागतामुळे सर्व विद्यार्थी आणि पालक भारावून गेले होते. या स्वागतामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद व समाधानाचे भाव स्पष्ट दिसत होते.
सनदी अधिकाऱ्यांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत
जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी अहिल्यानगर तालुक्यातील निंबोडी येथील शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. यावेळी डॉ. आशिया यांच्या हस्ते ‘इन्फोसिस स्प्रीनबोर्ड- मेकर लॅब ऑन व्हील्स’ या उपक्रमाचा शुभारंभही करण्यात आला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी भोरवाडी येथील शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत केले तर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी बुऱ्हाणनगर येथील शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत केले.