शेवगाव (प्रतिनिधी) भारदे साक्षरता प्रसारक मंडळाचे पद्मभूषण बाळासाहेब भारदे हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय शेवगाव येथे शाळेच्या परंपरेला साजेसा प्रवेशोत्सव कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. नवीन शैक्षणिक वर्ष 2025 – 2026 मध्ये इयत्ता पाचवी व इतर इयत्तेमध्ये प्रवेश घेतलेल्या नवागतांच्या स्वागतासाठी शालेय परिसराचे मनोहर सुशोभन करण्यात आले होते, आकर्षक रांगोळी व फलक लेखन, मुलांना आवडणाऱ्या कार्टूनच्या वेशभूषेत मुलांचे केलेले सवाद्य स्वागत या अनपेक्षित स्वागत सोहळ्याने मुले भारावून गेली.
संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य रमेश भारदे, शाळा समिती अध्यक्ष हरीश भारदे, प्राचार्य संजय कुलकर्णी, उपप्राचार्य गोकुळ घनवट ,पर्यवेक्षक उमेश घेवरीकर ,वैशाली जुन्नरकर आदींच्या हस्ते नवीन मुलांचे मोफत पाठ्यपुस्तके देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी पालक प्रतिनिधी डॉक्टर अरविंद पोटफोडे, महेश शिंदे ,लहू तांभोरे, गोरक्षनाथ वावरे ,गणेश वावरे उपस्थित होते. यावेळी बोलताना हरीश भारदे म्हणाले, शाळेचे हे अमृत महोत्सवी स्थापना वर्ष असल्याने या शैक्षणिक वर्षांमध्ये विद्यार्थी हितावह उपक्रम व दर्जेदार अध्यापनातून शाळेच्या गुणवत्तेचा आलेख अधिक उंचावण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.शाळेने उपलब्ध करून दिलेल्या सर्व संधी व सुविधाचा लाभ विद्यार्थी पालकांनी घ्यावा.प्रास्ताविक प्राचार्य संजय कुलकर्णी ,सूत्रसंचालन निलेश मोरे यांनी केले तर उमेश घेवरीकर यांनी आभार मानले.