शेवगाव ( प्रतिनिधी) :- शिक्षण आणि सहकाराच्या माध्यमातून समाज निर्मितीसाठी कार्यरत असलेल्या आबासाहेबांनी आपले तत्व आणि विचारांशी कधीही प्रतारणा केली नाही. पर्यायाने त्यांना क्षमतेपेक्षाही कमी संधी मिळाल्या. व्यवस्थेविरुद्ध काम करणारी किंवा आवाज उठवणारी कृती ही बंडखोरी ठरवली जाते.परंतु अशी बंडखोरी सकारात्मक असते.बंडखोर स्वभावाचा माणूस असणं हे समाजाच्या प्रगतीचे लक्षण आहे. अशा स्वभावाच्या आबासाहेबांनी समाजाच्या प्रगतीसाठी माती आणि जगाशी नातं जोडणाऱ्या शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्याने समाज उभारणीच मोठ कार्य उभा राहिल्याचे गौरव उद्गार नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी केले.
आज दि २८ रोजी कर्मयोगी आबासाहेब काकडे यांच्या १०६ व्या जयंती सोहळ्या निमित्त आयोजित ‘आठवणीतले आबासाहेब’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आणि इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ‘कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) कोर्स’ व ‘पाककला शिक्षण उपक्रमा’च्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार सत्यजित तांबे, मा.जि.प.सदस्य विक्रम तांबे, चपराक प्रकाशनचे संपादक तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष घनश्याम पाटील, राज्य अभ्यासक्रम व पुनर्रचना मंडळाचे सदस्य तथा पुस्तकाचे संपादक संदीप वाकचौरे, आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष अॅड.डॉ.विद्याधर काकडे, महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती सौ.हर्षदा काकडे, शैक्षणिक समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.लक्ष्मण बिटाळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीसिंह काकडे, जगन्नाथ गावडे, अॅड.सुभाष भोर,अभिजीत लुनिया, गोरक्ष मदने, सुधीर तनपुरे, डॉ.अमोल फडके, डॉ.हेमलता लाखे, शुभांगी पाटील, प्रा.रामराजे लाखे, अनिल पाटील, प्राचार्य संपत दसपुते आदि प्रमुख उपस्थित होते.
पुढे बोलताना आमदार तांबे म्हणाले की, गोरगरिबाच्या विकासासाठी आबासाहेबांनी गावोगावी शिक्षण संस्था उभारल्या, वसतिगृह काढली, पाणी प्रश्नावर काम केले आणि सत्यनिष्ठ भूमिकेचा अंगीकार करत तळागाळातील माणसाच्या भल्यासाठी अव्याहतपणे कार्य उभा केले. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असतानाही आपले संपूर्ण आयुष्य सामान्य माणसाच्या सुधारणेसाठी दिल्याचे मधुर फळे आज अनेक क्षेत्रात स्वतःला सिद्ध करणारे अनेक जण अनुभव आहेत असेही ते बोलतांना म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष ॲड .विद्याधर काकडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.गोविंद वाणी व प्रा.जरीना शेख यांनी तर वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
समाजाबद्दल तळमळ असणाऱ्या पिढीमुळे वेगवेगळ्या सामाजिक चळवळी उभा राहिल्या आणि यशस्वीही झाल्या. पर्यायाने बिघडलेल्या अवस्थेत देखील समाज रचना व्यवस्थित चालू असते. याच कारणीभूत असलेली अशी माणसे अलीकडे कमी झाल्याचे वास्तव आठवणीतले आबासाहेब या पुस्तकाचे संपादक प्रा.संदीप वाकचौरे यांनी केले.
जगाशी नातं जोडणाऱ्या नाविन्यपूर्ण शिक्षणउपक्रमास प्रशिक्षण देणे काळाची गरज आहे. बहुदा जिल्ह्यामध्ये AI ला अनुसरून पाठ्यक्रमाची सुरुवात होणे ही पहिलीच वेळ असल्याचे आ.तांबे यांनी यावेळी स्पष्ट केले.