सोलापूर ( प्रतिनिधी) : पंढरपूरच्या यंदाच्या आषाढी वारीत उच्चांकी २८ लाख वारकरी आणि भाविकांची मांदियाळी जमली होती. परंतु एवढ्या मोठ्या गर्दीवर नियंत्रण मिळवून संपूर्ण वारी सुकर करण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनाने अथक मेहनत घेऊन यशस्वीरीत्या पेलले. चेंगराचेंगरी, अपघात व इतर आपत्ती कोसळू न देता झालेल्या नियोजनात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा झालेला गुणात्मक वापर महत्त्वाचा ठरला.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केलेल्या उत्तम नियोजनामुळे आषाढी वारी यशस्वी ठरली. या माध्यमातून नाशिकमध्ये तोंडावर आलेल्या कुंभमेळ्यासाठी पंढरपूरच्या आषाढी वारीचे अचूक नियोजन पथदर्शी ठरण्याच्या दृष्टीने सादरीकरण केले जाणार आहे.
जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांनी ही यशोगाथा प्रसार माध्यमांसमोर मांडली. कुलकर्णी म्हणाले, आषाढी वारीत प्रथमच एआय तंत्रज्ञानासह अत्याधुनिक ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर झाला. त्यामुळे गर्दीवर अचूक नियंत्रण करणे शक्य झाले. हे नवतंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पोलिसांना दोन महिने अगोदरपासूनच प्रशिक्षण देण्यात आले.
तसेच पंढरपुरातील जास्त गर्दीच्या ठिकाणावर विशेष लक्ष ठेवण्यात आले. विशेषतः काही विशिष्ट परिसरात एकेरी मार्ग करण्यात आला होता. महाद्वार घाट, महाद्वार चौक, नामदेव पायरी, पश्चिम द्वार, चौफाळा, नाथ चौक, चंद्रभागा नदीवरील जुना दगडी पूल आणि ६५ एकर परिसरात कार्ट टीम नियुक्त करण्यात आली होती. या कार्ट टीमने गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी मोठ्या दोरखंडाचा वापर करून गर्दी रोखणे आणि पुढे नेणे (ओल्ड अँड रिलीज) पध्दतीने गर्दी नियंत्रण, चेंगराचेंगरी, अपघात असे प्रकार टाळता आले.
एवढ्या गर्दीतही बेशुद्ध पडलेल्या १३० भाविकांना कोर्ट टीमने बाहेर काढून त्यांना प्राथमिक उपचार उपलब्ध करून दिले. दुसरीकडे गर्दीत चुकामूक किंवा हरविलेल्या २३८० भाविक आणि वारकऱ्यांना त्यांच्या नातेवाइकांचा शोध घेऊन हवाली करण्यात आले. या वारीमध्ये एक विवाहित महिला आपल्या चिमुकल्या बाळाला कडेवर घेऊन आली होती.
यात तिलाही सुरक्षतेबद्दल विश्वास होता. तसेच या वारीत चोऱ्या, लूटमारीसारखे प्रकार रोखण्यासाठी पोलिसांनी सतर्कता दाखवून १५६ संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ३२ तोळे सोने हस्तगत केले. हे चोरीला गेलेले सोने संबंधित व्यक्तींच्या जिथल्या तिथेच हवाली करण्यात आले.
या वारीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पंढरपुरासह संपूर्ण पालखी मार्गावर वाहतुकीचे उत्तम नियोजन करण्यात आले. सुमारे ५० हजार जड वाहनांसह हलकी चारचाकी वाहने आली होती. त्यांच्या वाहन थांब्यांचा प्रश्न होता. परंतु कोठेही वाहतूक विस्कळीत झाली नाही. एवढेच नव्हे तर संपूर्ण वारी अपघातमुक्त झाली.
या संपूर्ण वारीतील गर्दीच्या नियोजनासाठी आपत्ती प्रतिसाद प्रणालीचा सुयोग्य वापर केला. यात संशोधकांना वारीतील गर्दीचे नियंत्रण आणि नियोजन कसे करता आले, यावर संपूर्ण अभ्यास करण्याच्या दृष्टीने सर्व तपशील उपलब्ध करून देण्याची तयारी पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांनी दाखविली आहे.