१५ देशात अकरा वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवत देशाला २०४७ पर्यंत महासत्ता बनविण्याच्या दिशेनं सुरू असलेले प्रयत्न हे फार मोठे आहेत. देशात विविध क्षेत्रात विकासाची घेतलेली झेप हो सुध्दा फार मोठी आहे. गरीबांना घरं, उज्वला योजनेच्या माध्यमातून घरोघरी आलेला गॅस, शेकडो अशा अनेक योजना खालच्या माणसांचं जीवनमान उंचविणाऱ्या आहेत. मोदींच्या नेतृत्वात आम्हाला काम करायला मिळतंय ही आमच्यासाठी फार मोठी बाब आहे, असे मत पशुसंवर्धन व पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले.
अमरावतीत दोन दिवसीय दौऱ्यानिमीत्त आले असता त्यांनी पत्रकाराशी संवाद साधला. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, या मुख्य मागणीसह एकूण १७मागण्यांसाठी माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केलेलं अन्नत्याग आंदोलन काल (१४ जून) राज्य सरकारच्या आश्वासनानंतर मागे घेतलं आहे. दरम्यान, याबाबत भाजपाच्या नेत्या आणि पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी भाष्य केलं. आमचे नेते चंद्रशेखर बावनकुळे हे स्वतः बच्चू कडूंना भेटायला गेले होते. तसंच, फोनवर बच्चू कडू यांच्याशी आपलं बोलणं झालं असून त्यांना वेगळं भेटण्याचं काही कारण नाही, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
भाजपाचे शहर अध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांच्या निवासस्थानी पंकजा मुंडे यांनी शनिवारी सायंकाळी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. यानंतर रविवारी सकाळी पंकजा मुंडे यांनी अमरावतीचं ग्रामदैवत असणाऱ्या श्री अंबादेवी आणि श्री एकविरा देवीचं दर्शन घेतलं. यानंतर पक्ष कार्यकत्यांशी संवाद साधल्यावर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या बच्चू कडू यांची तुम्ही भेट घेणार का? असा सवाल पंकजा मुंडे यांना करण्यात आला.