शेवगाव : सामनगाव येथे सुरु असलेली अवैध दारु त्वरीत बंद करावी अशी मागणी ग्रामपंचायतच्या वतीने पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्याकडे निवेदनाव्दारे करतांना सरपंच आदिनाथ कापरे, उपसरपंच प्रमोद कांबळे व इतर ग्रामपंचायत सदस्य.
शेवगाव – मुख्य राज्यमार्गावर तसेच विदयालयासमोर अवैध दारु विक्री खुलेआम सुरु असल्याने गावातील अनेक तरुण मुले या व्यसनाच्या आहारी गेले आहेत. त्यातून अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत.आता शाळकरी मुले देखील व्यसनाधीन बनल्याने रोज छोटे मोठे वाद होत आहेत.याबाबत पोलीस प्रशासनाने वेळीच दखल घेऊन खुलेआम सुरु असलेल्या अवैध दारु विक्रीचा बंदोबस्त करावा,अशी मागणी सामनगाव ग्रामपंचायतीच्या वतीने पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना निवेदनाव्दारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की,सामनगाव गावामध्ये अवैध दारु व विक्री व्यवसाय राजरोसपणे सुरु आहेत. या दारुमुळे तरुण -वृध्द व्यसनाधिन झाले आहेत. या व्यवसायामुळे गावातील महिलांना सुरक्षीत वातावरण राहीलेले नाही.गावामधील घरांघरांमध्ये वाद होत असल्याने महिलावर्गांचे संतुलन बिघडले आहे. तसेच गावातील अनेक व्यवसायावर विपरीत परिणाण झाला आहे.गावातील अवैध दारु व्यवसाय बंद होणे गरजेचे आहे. तसेच ग्रामपंचायत कार्यालयाच्या आडोशाला व गावातील पाणीपुरवठा करणा-या जलकुंभाखाली जुगार खेळणारांची संख्या वाढली आहे.या अवैध व्यवसायांचा त्वरीत बंदोबस्त न केल्यास ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल.
असा इशारा निवेदनाव्दारे दिला आहे.ग्रामपंचायतच्या वतीने अवैध दारु बंद करण्याचा ठराव करण्यात आला असून तो या निवेदनाबरोबर देण्यात आला आहे. यावेळी सरपंच आदिनाथ कापरे, उपसरपंच प्रमोद कांबळे,ग्रामपंचायत सदस्य कृष्णा सातपुते, देवदान कांबळे, अरुण काळे, मार्तंड नजन, लाला शेख आदी उपस्थित होते. निवेदनाची प्रत पोलीस अधिक्षक, तहसील कार्यालय, उपविभागीय पोलीस अधिकारी, गटविकास अधिकारी आदींना देण्यात आली आहे.
दरम्यान , काल रविवार ता.१५ रोजी काही टारगटांनी गावातील प्राथमिक शाळेमध्ये लावलेले वृक्ष व इतर साहीत्यांची मोडतोड केली.तर सारपे वस्तीवरील प्राथमिक शाळेतील खोलीचे कुलूप तोडून तांदुळ व इतर साहीत्याची चोरी केली. विदयार्थ्यांनी वर्षभर पाणी घालून वाढवलेल्या झाडांची कत्तल केल्याने पालकांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला आहे.
आज सोमवार ता.१६ रोजी पहिल्याच दिवशी मुलांना व शिक्षकांना हा प्रकार पहायला मिळाला.याबाबत ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने शेवगाव पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दाखल केली असून या प्रकराची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.