शेवगाव ( प्रतिनिधी) २१ जून हा योग व प्राणायामाची जगाला ओळख करून देणारा दिवस आहे. शरीर मन आणि आत्मा यांचे संतुलन राखणारा योग हा एकमेव मार्ग आहे. योगामुळे आत्मिक उन्नती होते. योग हा भारतीय संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे असे प्रतिपादन आबासाहेब काकडे शिक्षण समूहाच्या शिक्षण विभाग प्रमुख प्रा.वंदना पुजारी यांनी केले.
आज आबासाहेब काकडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शेवगाव येथे योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. पुजारी पुढे बोलताना म्हणाल्या की,योगामुळे आपले शरीर व मन निरोगी राहते. शरीर लवचिक आणि मजबूत बनते. तसेच आपली रोगप्रतिकारशक्तीही वाढते. जीवनातील ताण-तणाव कमी होतात. मनशांती मिळते. योगामुळे 3H (Head,Heart,Hand) चा विकास होतो. माणसाची एकाग्रता वाढते व कोणत्याही गोष्टीत लक्ष केंद्रित करण्यासाठी योग व प्राणायामाची मदत होते. त्यामुळे आजपासून आपण सर्वजण दररोज योग व प्राणायाम करण्याचा संकल्प करूया असे त्या म्हणाल्या. यावेळी त्यांनी स्वामी विवेकानंदांच्या ‘उठा, जागे व्हा, ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका’या संदेशाची आठवणी करून दिली.
यावेळी व्यासपीठावर ह.भ.प. शिवाजी महाराज काळे, शेवगाव वाहक नियंत्रक किरण शिंदे,प्राचार्य संपतराव दसपुते,उपमुख्याध्यापिका पुष्पलता गरुड,पर्यवेक्षक सुनील आव्हाड,लक्ष्मण गाडे, योग गुरु लक्ष्मण शास्त्री सर, प्राथमिक विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका परविन पटेल, निर्मलब्राईट फ्युचर स्कूलचे प्राचार्य दत्तात्रय मोरे, कला विभाग प्रमुख अशोक तमनर, विज्ञान विभाग प्रमुख रवींद्र आगळे , समन्वयक ज्ञानेश्वर लबडे, आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी योगगुरु लक्ष्मणशास्त्री नलवडे यांच्या मार्गदर्शनाखाली ५००० हून अधिक विद्यार्थी विद्यार्थिनी, प्राध्यापक, शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी योग व प्राणायामाचे धडे गिरवले. योग गुरु लक्ष्मणशास्त्री नलवडे यांनी योग व प्राणायमाची प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांकडून करून घेतली व त्याचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात उपमुख्यध्यापिका पुष्पलता गरुड यांनी योग व प्राणायामाचे महत्त्व स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर गरड यांनी केले. तर उपस्थितांचे आभार मच्छिंद्र टेकुळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.