शेवगाव (प्रतिनिधी) प्रवरा शैक्षणिक समूहाच्या डॉ.बाळासाहेब विखे पाटील सीबीएसई स्कूल व शेवगाव इंग्लिश मीडियम स्कूल शाळेमध्ये वृक्ष संवर्धन ही काळाची गरज असून पर्यावरणाचे महत्त्व विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याच्या उद्देशाने आषाढी एकादशी निमित्त वृक्षदिंडी आयोजित करण्यात आली होती.
प्रवरा शैक्षणिक समूहाचे कार्यकारी संचालक पंजाबराव आहेर पाटील, प्राचार्या वर्षा दारकुंडे यांच्या हस्ते पालखीची विधिवत पूजा करण्यात आली तसेच पालखीमध्ये विठ्ठल रखुमाई फोटो सोबत, पवित्र तुळसी वृक्ष, ठेवण्यात आला होता तसेच विद्यार्थ्यांनी विठ्ठल रखुमाई वेशभूषा केली होती यावेळी प्रमुख अतिथींच्या हस्ते शालेय प्रांगणात काजू व नारळ या वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले.
दोन्ही शाळेतील विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषा केली होती.टाळ मृदंगाच्या तालावर विठ्ठल रखुमाईचा जयघोष करत दिंडीचे प्रस्थान शाळेच्या प्रांगणातून साई मंदिर पर्यंत करण्यात आले होते.हरिभक्त पारायण दिनेश महाराज उदागे यांनी दिंडीचे नेतृत्व केले. विद्यार्थ्यांनी पर्यावरणावर आधारित घोषवाक्य तयार केली होती .तसेच घोषणाही दिल्या. अभंगाच्या तालावर विद्यार्थ्यांनी पावली नृत्याचा ठेका धरला. दिंडी शाळेत आल्यानंतर पारंपारिक रिंगण सोहळा पार पडला,यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते.
विद्यालयाच्या शिक्षिका सौ.प्रियंका धावणे व ह.भ.प. दिनेश महाराज उदागे यांनी वृक्ष संवर्धन या विषयावर सुंदर निरूपण केले.विद्यार्थी व शिक्षकांनी अभंग व फुगडी नृत्य सादर केले. डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या या उत्सवाने वातावरण भक्तीमय झाले होते.यावेळी उपप्राचार्य विजय चन्ने ,रमेश कवडे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संदीप गाढे यांनी केले. संगीत शिक्षक संदीप शिंगटे,स्वप्निल शिंदे यांनी मृदंग व संगीताची उत्तम साथ दिली.