आमदार पडळकरांवर गुन्हा दाखल करण्याची जोरदार मागणी
शेवगाव ( प्रतिनिधी) सकल ख्रिस्ती समाज, शेवगाव तालुका यांच्यातर्फे एक निवेदन तहसीलदार शेवगाव यांच्याकडे सादर करण्यात आले. दिनांक ६ जून २०२५ रोजी सांगली जिल्ह्यातील कुपवाड येथे स्व. ऋतुजा राजगे या तरुणीने आत्महत्या केल्यानंतर, या प्रकरणाची केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI)मार्फत सखोल चौकशी व्हावी आणि संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी समाजबांधवांनी निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, या आत्महत्येचा संदर्भ ख्रिस्ती धर्म व धर्मगुरूंशी जोडून काहीजण सामाजिक तणाव निर्माण करत आहेत. विशेषतः महाराष्ट्राचे आमदार श्री. गोपीचंद पडळकर यांनी ख्रिस्ती धर्मगुरूंबाबत अतिशय धक्कादायक, भडकाऊ आणि हिंसक वक्तव्य केल्याचा गंभीर आरोप समाजबांधवांनी केला आहे. त्यांनी आपल्या जाहीर भाषणात, “जो ख्रिस्ती धर्मगुरू गावात येईल त्याचा सैराट पद्धतीने खून करणाऱ्याला ११ लाखांचे बक्षीस दिले जाईल,” असे म्हणत थेट ख्रिस्ती समाजाच्या धर्मगुरूंना धमकावले आहे, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
या प्रकारच्या विधानामुळे ख्रिस्ती धर्मगुरूंच्या तसेच समाजाच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी केलेले हे वक्तव्य अत्यंत निषेधार्ह असून, भारतीय न्यायसंहितेनुसार त्यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करावा व त्यांच्या विरोधात कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी समाजाची ठाम भूमिका आहे.
ख्रिस्ती धर्मगुरूंना पोलिस संरक्षण देण्यात यावे, समाजाच्या धार्मिक स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, तसेच शांतताप्रिय ख्रिस्ती समाजाची बदनामी थांबवण्यासाठी शासनाने तातडीने पावले उचलावीत, अशीही मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
तहसीलदार यांना देण्यात आलेल्या या निवेदनावर अनेक ख्रिस्ती समाजबांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत. यामध्ये, फादर सुभाष त्रिभुवन, रेव्ह. जगदिश चक्रानारायण, पास्टर अमोल पवार, रेव्ह. संदिप मगर, मेजर बनकर, पास्टर देवानंद गायकवाड, पास्टर शिमोन पहिलवान, पास्टर फेलोशिप शेवगाव तालुका, सिस्टर उज्वला, सिस्टर ज्युली.सतीश मगर, अविनाश मगरे,राजेंद्र मगर अजय मगर,कडूबा मगर,मनोज मगर, स्वप्निल मगर, आकाश गायकवाड,सुनील आहुजा,सिद्धार्थ लहासे, अनिल इंगळे,प्रतिभा बनसोडे, वैशाली मोहिते, मंगल मगर, शैला मगर यांच्यासह अनेकांची उपस्थिती व पाठिंबा होता.
या संपूर्ण प्रकरणाकडे राज्य शासन आणि यंत्रणा गांभीर्याने लक्ष देईल, अशी अपेक्षा ख्रिस्ती समाजाने व्यक्त केली आहे.