विभागीय आयुक्त श्रीमती श्वेता सिंघल यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केला
शेवगाव (प्रतिनिधी)महसूल दिनाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयाने सन २०२५ साठी ‘उत्कृष्ट अधिकारी/कर्मचारी’ निवड आणि सन्मान सोहळ्याची घोषणा केली आहे. या मध्ये शेवगावचे भूमिपुत्र सध्या चिखली येथे तहसीलदार म्हणून कार्यरत असलेने संतोष सुमन दामोधर काकडे यांची वर्षभरातील त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल विभागीय पातळीवर उत्कृष्ट तहसीलदार म्हणून निवड करण्यात आली आहे.
महसूल दिनी विभागीय आयुक्त अमरावती विभाग श्रीमती श्वेता सिंघल मॅडम यांच्या हस्ते दिनांक १ ऑगस्ट महसुल दिनी पुरस्कार प्रदान केला आहे महाराष्ट राज्याला जिवंत सात बारा योजना प्रभावी राबविणारे कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणून कार्यरत असलेले तहसीलदार संतोष काकडे यांनी विविध निकषांवर आधारित मूल्यमापनात प्रभावी कामगिरी करत एकूण १३० पैकी ११७ गुण मिळवले. त्यांच्या निवडीमुळे महसूल प्रशासनातील त्यांची कार्यनिष्ठा आणि कार्यक्षमतेची पोचपावती मिळाली आहे. माहिती तंत्रज्ञानदृष्ट्या अद्ययावत ज्ञान वापरून दैनंदिन कामकाजात त्याचा विशेष उपयोग करतात. प्रशासनाला गती देण्यासाठी त्यांनी नवनवीन संकल्पना राबविल्या असून त्यामुळे कामात सुसूत्रता आणि वेग आला आहे. विविध दाखले देण्यासाठी त्यांनी गावोगावी तसेच शाळा-महाविद्यालयांमध्ये शिबिरे आयोजित करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. त्यामुळे नागरिकांना आवश्यक कागदपत्रे मिळवणे सोपे झाले आहे. पाणीटंचाई आणि नैसर्गिक आपत्तीच्या काळात त्यांनी तालुक्यात परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न केले, ज्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला. शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे काढून टाकण्यासाठी त्यांनी विशेष कामगिरी केली असून, अनधिकृत बांधकामांना आळा घालण्याच्या दृष्टीनेही त्यांची कामगिरी प्रशंसनीय आहे.
निर्धारित केलेल्या उद्दिष्टानुसार तपासणीचे काम पूर्ण करण्यासाठी ते प्रयत्नशील असतात. तसेच, न्यायालयीन आणि दंडाधिकारीय कामे सक्षमपणे आणि विहित कार्यपद्धतीने हाताळतात. निवडणुका, जनगणना, कृषीगणना आणि शासनाने वेळोवेळी सोपवलेल्या कामांमध्येही त्यांनी विशेष आणि उल्लेखनीय कामगिरी केली आहे. दप्तर दिरंगाई टाळण्यासाठी आणि ई-गव्हर्नन्स राबविण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. संतोष काकडे यांच्या या निवडीमुळे चिखली तालुक्याचे नाव उज्ज्वल झाले असून जिल्हाधिकारी कार्यालयाकडून त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.त्यांच्या निवडी बद्दल सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे