अहिल्यानगर ( प्रतिनिधी ): रोजच्या कामांमुळे महिलांना स्वतःचं आरोग्य जपायला वेळ मिळत नाही. ही गंभीर बाब लक्षात घेऊन, महिलांना घरबसल्या आरोग्यविषयक मार्गदर्शन उपलब्ध व्हावे. या उद्देशाने व्यंकटेश मल्टीस्टेट आणि व्यंकटेश फाऊंडेशन यांच्या वतीने नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर ‘महिलांसाठी आरोग्य जागर’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष कार्यक्रमाद्वारे महिलांना त्यांच्या आरोग्याविषयी मोलाचे मार्गदर्शन मिळणार असल्याची माहिती व्यंकटेश मल्टीस्टेटच्या हेड सौ श्रुती शेटे यांनी दिली आहे. पुढे ते म्हणाले, हा उपक्रम विशेषतः आधुनिक पद्धतीने गुगल मिटद्वारे दिनांक २७ सप्टेंबर २०२५ रोजी, दुपारी ४.०० वाजता आयोजित करण्यात आला आहे. जेणेकरून व्यस्त दिनचर्येतील कोणत्याही महिलेला कुठेही बाहेर न जाता घरबसल्या या मार्गदर्शनाचा लाभ घेता येईल.
कार्यक्रमाच्या आयोजना मागचा उद्देश स्पष्ट करताना श्रुती शेटे म्हणाल्या, महिला कुटुंबाचा आधारस्तंभ आहेत, पण बहुतांश महिला कामाच्या व्यापामुळे स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देऊ शकत नाही. याचबरोबर दवाखाना म्हटल्यावर आर्थिक बाबींचीही समस्या अनेक महिलांना येते. याच गोष्टीची जाणीव ठेवून, महिलांना त्यांच्या आरोग्याच्या समस्यांवर वेळेत मार्गदर्शन मिळावे. यासाठी आम्ही हा उपक्रम हाती घेतला आहे. तसेच, ‘गुगल मिट’च्या माध्यमातून जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचून त्यांना आरोग्य जपण्यास प्रवृत्त करणे, हेच आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.
या कार्यक्रमात प्रसिद्ध स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञ डाॅ. सुलभा पवार या मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांना PCOS व वंध्यत्व उपचार, प्रसूती मार्गदर्शन, कॅन्सर लसीकरण, आहार आणि मानसिक आरोग्य अशा विविध आणि महत्त्वाच्या विषयांवर सखोल माहिती मिळणार आहे. व्यंकटेश मल्टीस्टेट आणि व्यंकटेश फाऊंडेशनने सर्व महिलांना आवाहन केले आहे की, त्यांनी या ऑनलाईन उपक्रमात सहभागी होऊन आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता या मार्गदर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा.




